oze

ओझे

Yashwant Kale General Leave a Comment

एके दिवशी काही कामानिमित्त शिरूरहून पुण्याला जाणे झाले . दिवसभरातील कामे उरकत असताना झगमगणाऱ्या पुण्याचे ,उंच इमारतींचे प्रशस्त रस्ते व त्यावरून धावणाऱ्या रिक्षांपासून imported गाड्यांचे ,मनाला भुरळ पाडणाऱ्या वस्र दालनांचे ;तसेच खवय्ये पुणेकरांनी गर्दी केलेल्या अनेक हॉटेलांचे मी सहज निरीक्षण करत होतो.
एकदाची सर्व कामे संपली व मी शिरूर बस पकडण्यासाठी बसथांब्यावर गेलो . सुदॆवाने गाडी गेली नव्हती. मी बसच्या पुढच्या भागात व दरवाज्यासमोरच्या बाकड्यावर बसलो. हळूहळू लोक येत होते, तरीसुद्धा बस बरीच रिकामी होती. मी बाहेरचे निरीक्षण करत असतानाच एक बुटकी, किरकोळ शरीरयष्टीची, रंगाने सावली,मळके लुगडे नेसलेली महिला डोक्यावर भले मोठे ओझे घेऊन बसजवळ थांबली. डोक्यावरचे ओझे मोठ्या खोक्याच्या आकारासारखे होते. खोक्यामध्ये काय आहे हे सांगणे शक्य नव्हते; परंतु डोक्यावरचे ओझे खाली ठेवताना तिच्याकडची झोळी सदृश पिशवी खाली पडली त्यातून लहान मुलांची खेळणी, कंगवे, फणी, यांसारख्या वस्तू पडल्या. तिचे राहणीमान व पडलेल्या वस्तूंवरून ती बाजारात अथवा यात्रेत खेळणी विकणारी बाई असावी , असा मी अंदाज बांधला.
खाली पडलेली खेळणी परत पिशवीमध्ये भरून ती बसच्या वाहकाजवळ आली व बस कोठे जाते, असे विचारून ती डोक्यावरचे ओझे घेऊन दरवाजापाशी आली.
ती महिला ओझे घेऊन गाडीमध्ये येणार तेवढयात घंटा वाजली. माफ करा बसची नव्हे, तर वाहकाची नकारघंटा वाजली. वाहकाने ते ओझे आत घेण्यास स्पष्ट नकार दिला; कारण तसे योग्य होते. खोक्याचा आकार पाहता ते बसमध्ये कुठल्याही रिकाम्या जागेत बसेल असे वाटत नव्हते व जेथे शक्य होते तेथे आधीच काही प्रवासी बसले होते. बसच्या छतावर ते ओझे न्यावे, तर बस स्थानकावर हमालांचा दुष्काळ आणि वाहकाची मदत घ्यावी, तर वाहकही ‘लेडीस कंडक्टर’ अशा चक्रव्यूहात ती सापडली होती. ती वाहकाला वारंवार विनंती करीत होती;परंतु वाहकाचा नाइलाज होता. ती महिला वारंवार गाडीमध्ये डोकावून ‘त्या’ ओझ्यासाठी थोडीशी जागा, एखादा आशेचा किरण शोधत होती. पण ते सर्व एका ‘डबल बेलने’ व्यर्थ घालविले. गाडी चालू झाल्यानंतर तिच्या घामाने डबडबलेल्या चेहऱ्यावर चिंता, निराशा, राग अशा विविध भावनांचे प्रतिबिंब दिसू लागले. ती निष्क्रिय बनून कंबरेवर हात ठेऊन गाडीकडे एकटक पाहत राहिली. हळूहळू गाडी पुढे निघाली, ती महिला नजरेआड गेली. विठ्ठल- रुक्मिणीसारखे कंबरेवर हात ठेवून उभी असलेली तिची मूर्ती मात्र माझ्या डोळ्यांसमोरून हालत नव्हती. माझी या प्रसंगावर विचार प्रक्रिया सुरु झाली.
ती एक ‘स्री’ होती. तिला स्वतःची मुले- कुटुंब असणार.मुले लहान असतील, तर ज्याप्रमाणे पक्षिणीची पिले चाऱ्यासाठी चोच उघडी करून त्यांच्या आईची वाट पाहतात, त्याप्रमाणे ती मुले देखील तिची वाट पाहत असतील. त्या स्रीची देखील ‘घार उडते आकाशी, तिचे लक्ष पिलांपाशी’ अशीच अवस्था असणार. ‘दुष्काळात तेरावा महिना’ म्हणजे सुर्य मावळतीला होता. अंधार पडण्याच्या बेतात होता. बाजारात खेळणी विकणाऱ्या बाईला ते ओझे स्वतंत्र रिक्षा अथवा वाहन करून घरी पोचविणे परवडणारे नव्हते. बसचा प्रवास तिच्यासाठी आर्थिकदृष्टया सोईस्कर होता.; पण हक्काचे वाहन असूनही तिला त्याचा फायदा झाला नाही. त्या खोक्याचे ओझे तिने मघाशीच खाली ठेवले होते;परंतु तिचे डोक्यावरील कुटुंबाचे ओझे (अदृश्य) कधीच कमी होण्यासारखे नव्हते.
साधारणतः अडीच तासानंतर मी माझ्या घरी पोचलो. प्रवासाचा थकवा कमी करावा म्हणून टीव्ही चालू केला. अर्ध्यापेक्षा जास्त चनेलवर जाहिरातींचाच भडीमार सुरु होता. एका जाहिरातीमध्ये ओझे वाहून नेणारी गाडी दाखवत होते, तर दुसऱ्या जाहिरातीमध्ये मोठमोठ्या इमारती, रस्ते बांधणाऱ्या सिमेंटचे गुणगान चालले होते. नवे- जुने सरकार, विकासकामे, आश्वासने, जाहीरनामे इत्यादींचे मुद्दे व त्यावर वादविवाद काही च्यानेल दाखवीत होते. हे पाहताना मला त्या गरीब बाईची आठवण आली. अन थोडे हसू आले; कारण ज्याप्रमाणे महाभारतात रस्त्यात शेपटी पसरून बसलेल्या हनुमानाचे शेपूट दूर करण्यास भीम असमर्थ ठरला त्याप्रमाणे टीव्हीवरच्या जाहिरातींतील कोणतेही वाहन, कोणताही रस्ता,कोणतेही सरकार त्या बाईच्या डोक्यावरील ओझे तिच्या घरी पोचविण्यास समर्थ नव्हते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *